WiFi : मोफत पब्लिक वाय-फाय वापरताय? बँक खातं रिकामं होण्याआधी ‘हे’ वाचा
मोफत पब्लिक वाय-फाय ही आधुनिक जीवनाची गरज बनली आहे, पण यासोबत येणारे सायबर धोके गंभीर आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय आणि तरुण, जे कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय वापरतात, त्यांना याबाबत जागरूक करणं गरजेचं आहे.

एअरपोर्ट, कॅफे किंवा मॉलमध्ये मोफत पब्लिक वाय-फाय वापरता? मग सावध व्हा! मोफत वाय-फाय सोयीस्कर वाटत असलं, तरी ते धोकादायक ठरू शकतं. केंद्र सरकारने याबाबत अलर्ट जारी केला आहे. पब्लिक वाय-फायवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार करू नका, असा सल्ला दिला आहे. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकतात
पब्लिक वाय-फाय का धोकादायक?
अनेक पब्लिक वाय-फाय नेटवर्क सुरक्षित नसतात. हॅकर्ससाठी ही नेटवर्क्स सोपं लक्ष्य असतात. सायबर गुन्हेगार तुमच्या उपकरणात प्रवेश करू शकतात. तुमचे पासवर्ड, वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील चोरू शकतात. यामुळे डेटा चोरी किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतं. अगदी ईमेल तपासणं किंवा सोशल मीडियावर लॉग इन करणंही जोखमीचं ठरू शकतं.
CERT-In चा सल्ला
भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (CERT-In) ने ‘जागरूकता दिवस’ निमित्त हा इशारा दिला आहे. CERT-In ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणारी राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सी आहे. यांचं काम सायबर हल्ले रोखणं आणि डिजिटल जग सुरक्षित ठेवणं आहे. त्यांनी सांगितलं, की पब्लिक वाय-फायवर बँकिंग, ऑनलाइन खरेदी किंवा संवेदनशील कामं टाळावीत.
सुरक्षित राहण्यासाठी काय कराल?
CERT-In ने काही सोप्या आणि महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स दिल्या आहेत
अनोळखी लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका.
सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत आणि लांब पासवर्ड वापरा.
महत्त्वाच्या फाइल्सचा बाह्य ड्राइव्हवर नियमित बॅकअप ठेवा.
अनोळखी वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा पेमेंटशी संबंधित कोणतंही काम करू नका.
या सवयी तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.
