तुम्ही सुद्धा ‘या’ भाज्या चिरल्यानंतर लगेच शिजवता तर थांबा, ही चूक तुम्हाला पडु शकते महागात
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सकस आणि पोषक आहाराचे सेवन करत असतो. अशातच जेवण बनवताना काही भाज्या कापल्यानंतर लगेच आपण भाजी करतो पण काही भाज्या अशा आहेत ज्या कापल्यानंतर काही वेळ तसेच ठेवणे चांगले. चला अशा भाज्यांबद्दल जाणून घेऊयात.

आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण अनेक प्रकारच्या हंगामी भाज्यांचे सेवन करत असतो. अशातच स्वयंपाकघरात जेवण बनवताना भाज्या चिरून लगेच फोडणी देऊन शिजवणे ही क्रिया प्रत्येकजण करत असतो. यामुळे वेळेची बचत तसेच भाज्यांची चव द्विगुणित होते. कारण भाजीतील पौष्टिक घटक टिकवून ठेवण्यासाठी आपण त्या लगेच फोडणी देतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने काही भाज्यांच्या बाबतीत चिरून लगेच फोडणी देणे चुकीचे ठरू शकते. याशिवाय भाजीचे पौष्टिक घटक आणि चव देखील अन्न तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. प्रत्येक भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते.
काही भाज्या चिरल्यानंतर लगेच शिजवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा भाज्या चिरल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात. पण काही भाज्या अशा आहेत ज्या चिरल्यानंतर लगेच शिजवू नयेत. कारण त्यातील काही निष्क्रिय एंजाइम आणि संयुगांची प्रक्रिया सुरू होते. तर या प्रक्रियेतुन पॉवरफुल आणि आरोग्यदायी संयुगे तयार होतात. त्यामुळे अशा चिरल्यानंतर लगेच शिजवल्यास भाज्यांचा रंग आणि चव खराब होऊ शकते. तसेच, त्यातील पोषक घटक देखील कमी होऊ शकतात. परिणामी आपल्याला त्या भाजीचे पूर्ण आरोग्यदायी फायदे मिळत नाही.
या भाज्या चिरल्यानंतर लगेच शिजवू नका
भेंडी
बहुतेकजण भेंडी चिरल्यानंतर लगेच शिजवतात. पण हे करू नये. कारण भेंडीच्या आत एक चिकट पदार्थ असतो, ज्यामुळे कापल्यानंतर लगेच शिजवल्यास ते खूप चिकट होते. अशा वेळेस प्रथम भेंडी धुवा आणि नंतर ती कापून घ्या आणि काही वेळ पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवा. त्यानंतर ती शिजवा. यामुळे भेंडी चिकट होणार नाही आणि चवही अप्रतिम लागेल.
कोबी आणि फ्लॉवर
कोबी आणि फ्लॉवरच्या आत ग्लुकोसिनोलेट्स नावाचे एक घटक असते. जेव्हा ही भाजी चिरली जाते तेव्हा यातील काही एंजाइम सक्रिय होतात. त्यामुळे फ्लॉवर चिरल्यानंतर लगेच शिजवू नका. भाज्या चिरल्यानंतर 20-30 मिनिटे बाजूला ठेवा. त्यांनतर भाजी बनवा. तसेच कोबी कापून काही काळ मीठ आणि व्हिनेगरच्या पाण्यात ठेवणे चांगले. कारण पावसाळ्याच्या या हंगामात अशा भाज्यांमध्ये किडे असण्याची शक्यता असते.
वांगी
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे वांग्यामध्ये किड्यांचा प्रार्दूभाव वाढत असतो. त्याचबरोबर जेव्हा वांगी चिरतात तेव्हा वेळानंतर ते काळे दिसू लागते, हे ऑक्सिडेशनमुळे होते. त्यामुळे वांगी चिरून जर ते लगेच शिजवले तर ते थोडे कडू होऊ शकते आणि त्यातील पोषक घटक देखील कमी होऊ शकतात. म्हणून, वांगी कापल्यानंतर, ते काही काळ मिठाच्या पाण्यात ठेवणे चांगले.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
