रेल्वची वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास केवळ 1 रुपयात मिळेल विमानाची तिकीट!, कसे ते जाणून घ्या
रेल्वेची तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वे तिकीट बुकिंग कंपनी केवळ 1 रुपयात विमानाचे तिकीट देणार आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊया.

मुंबई, दररोज लाखो लोकं भारतीय रेल्वेने (India Railway) प्रवास करतात. तिकिटासाठी आवेदन करणाऱ्यांची संख्या त्यापेक्षाही अधिक असते. त्यामुळे बऱ्याचदा कन्फर्म सीट मिळण्यात अडचण येते. कन्फर्म सीट (Conform Ticket) न मिळाल्यास, प्रवाशाला वेटिंग तिकीट दिले जाते. परंतु, त्याच्या पुष्टीकरणाच्या शक्यतांबद्दल प्रवाशाला अचूक माहिती मिळू शकत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी ट्रेन तिकिट बुकिंग ॲप ट्रेनमॅनने एक नवीन फीचर आणले आहे.
ट्रिप ॲश्युरन्स फीचर
कंपनीने या फीचरला ट्रिप ॲश्युरन्स (Trip Assurance) असे नाव दिले आहे. यासह, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रिप पूर्ण करण्याची हमी दिली जाईल. ट्रेनमॅन ॲपवर तिकीट बुक करताना वापरकर्ते अंदाज मीटरवर टक्केवारी स्कोअर तपासू शकतात.
प्रवाशांना शेवटच्या क्षणी पर्यायी प्रवास आणि ट्रिप ॲश्युरन्सद्वारे कॅश बॅकचा पर्यायही दाखवला जाईल. जेव्हा चार्ट तयार केल्यानंतरही रेल्वेचे तिकीट कन्फर्म होणार नाही अशा परिस्थितीत हे वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त ठरेल.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, जर अंदाज मीटरनुसार तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता 90 टक्के किंवा त्याहून अधिक दर्शवत असेल तर ट्रिप ॲश्युरन्स 1 रुपया शुल्क आकारेल, परंतु, 90% पेक्षा कमी अंदाज दर्शविल्यास, तिकिटाच्या वर्गानुसार नाममात्र शुल्क आकारले जाईल.
अशा प्रकारे मिळेल मोफत विमान तिकिटे
रेल्वे विभागाने चार्ट तयार केल्यानंतर ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले तर ट्रिप ॲश्युरन्स फी खात्यात परत केली जाईल. जर ट्रेनचे तिकीट कन्फर्म नसेल तर प्रवाशाला कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता विमानाचे तिकीट देईल. म्हणजेच युजरला मोफत विमानाचे तिकीट मिळेल.
कंपनीने सांगितले आहे की ट्रिप ॲश्युरन्सचे नाममात्र शुल्क फक्त रु.1 पासून सुरू होते. सध्या ही सुविधा सर्व राजधानी ट्रेन आणि इतर ट्रेन बुकिंगसाठी सुरू करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या जवळपास 130 ट्रेनमध्ये ही सुविधा दिली जात आहे.
ट्रेनमॅनच्या सीईओने सांगितले की या योजनेचा उद्देश प्रवाशांना त्रासमुक्त अनुभव प्रदान करणे आहे. प्रतीक्षा तिकिटांचे कन्फर्म तिकिटांमध्ये रूपांतर करण्यासाठी कंपनीचे अंदाज मॉडेल 94 टक्के अचूकतेसह कार्य करते. परंतु, असे न झाल्यास, वापरकर्त्याला विनामूल्य विमान तिकीट दिले जाईल. हे फक्त विमानतळ उपलब्ध असलेल्या शहरासाठी वैध असेल.
