बँकेचे पासबुक चोरीला गेले? डुप्लिकेट मिळवण्याची सोपी प्रक्रिया काय?
तुमचे पासबुक हरवले तर घाबरू नका. या आर्टीकलमध्ये दिलेल्या सोप्या प्रक्रियेचा वापर करा आणि अगदी एका आठवड्यात नवीन पासबुक मिळवा.

आजकाल बहुतेक लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत खाते उघडतात. खाते उघडल्यानंतर तुम्हाला बँक कडून पासबुक मिळते, ज्यात तुमचे नाव, पत्ता, खाते क्रमांक आणि व्यवहारांची संपूर्ण माहिती असते. तुमचे पासबुक हे तुमच्या खात्याची ओळख असते आणि आर्थिक व्यवहारांमध्ये ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, कधी कधी तुमचे पासबुक हरवले किंवा चोरीला गेले तर चिंता करू नका. योग्य ती पावले उचलून तुम्ही सहज डुप्लिकेट पासबुक मिळवू शकता.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा
तुमचे पासबुक हरवल्याचे किंवा चोरीला गेले असल्याचे कळताच लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवा. एफआयआरमध्ये नमूद करा की तुमचे पासबुक हरवले आहे किंवा चोरीला गेले आहे. नोंदवल्यानंतर एफआयआरची एक कॉपी काढून ठेवा, कारण ही कॉपी बँकेत डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करताना आवश्यक असते. काही राज्यांमध्ये, जसे महाराष्ट्रात, आता ऑनलाईन एफआयआर नोंदवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.
बँकेत त्वरित माहिती द्या
एफआयआर नोंदवल्यानंतर लगेच तुमच्या बँकेच्या शाखेला माहिती द्या की तुमचे पासबुक हरवले आहे. यामुळे तुमच्या खात्याशी संबंधित अनधिकृत व्यवहारांना प्रतिबंध होतो आणि बँकेला माहिती दिल्याने तुमचे आर्थिक हित सुरक्षित राहते.
डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करा
तुमच्या बँक शाखेत जाऊन डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करा. या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात:
1. एफआयआरची प्रत
2. आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र
3. खाते क्रमांक आणि शाखेचा तपशील
4. काही बँकांमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटोही आवश्यक असतो
लक्षात ठेवा : अर्ज करण्यासाठी काही शुल्कही लागू शकते, जे बँकेनुसार वेगळे असू शकते.
अर्ज प्रक्रिया आणि पासबुक मिळण्याचा कालावधी
अर्ज व कागदपत्रे जमा केल्यानंतर बँक तुमची माहिती पडताळून पाहते. ही प्रक्रिया साधारणतः ७ ते १५ दिवसात पूर्ण होते, काही वेळा अधिक कालावधी लागू शकतो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बँक तुम्हाला नवीन डुप्लिकेट पासबुक प्रदान करते.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा
आजकाल अनेक बँका ऑनलाइन अर्ज स्वीकारतात, ज्यामुळे तुम्हाला बँकेत जाऊन वेळ घालवावा लागत नाही. ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात स्कॅन केलेले फॉर्म सबमिट करावे लागतात. काही बँका ईमेलद्वारेही अर्ज स्वीकारतात, त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होते.
