Aaditya Thackeray : भाजपातलं स्थान बघा अन् मलाई खा… आदित्य ठाकरे यांचा अण्णामलाई यांच्यावर निशाणा
अण्णामलाईंच्या मुंबईवरील वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने भाजपच्या पोटात दुखत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आल्याने राजकीय वातावरण तापले असून, महायुती आणि मविआच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.
तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय पडसाद उमटले आहेत. अण्णामलाई यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर संबोधत, ते महाराष्ट्राचे शहर नसल्याचे म्हटले होते. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अण्णामलाईंना भाजपमधील त्यांचे स्थान तपासण्याचा सल्ला दिला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने भाजपच्या पोटात दुखत असल्याचा आणि मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून ओळख संपवण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईला बॉम्बे संबोधण्याच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. मुंबईकर भाजपला धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनीही व्हिडिओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापले असून, महायुती आणि मविआच्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे.
