Thackeray Alliance : अनिल परब ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीला… मुंबईसह 5 महानगरपालिकांमध्ये ठाकरे युती होणार?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील पाच महानगरपालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. जागावाटपावर अंतिम चर्चा सुरू असून, लवकरच युतीची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युती जवळजवळ निश्चित झाली असून, केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सातत्याने बैठका सुरू होत्या. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यावर जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी होती. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेद्वारे करायची की संयुक्त मेळाव्याद्वारे, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मुंबईव्यतिरिक्त राज्यातील पाच महानगरपालिकांमध्येही ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
