Gautami Patil : गौतमी पाटीलला अटक होणार? अपघातातील जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबाची मागणी काय?
गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या कुटुंबियांनी पोलिसांवर तपास दिरंगाईचा आणि पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे.
गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी तिच्या अटकेची आणि अपघातातील वाहनचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे कुटुंबीय सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे पुणे पोलिसांकडे या संदर्भात दाद मागण्यासाठी आले होते.
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, अपघात घडल्यानंतर तातडीने रिक्षाचालकाला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अपघाताला कारणीभूत असलेली किया कॅरेन्स ही गाडी पंचनामा होण्यापूर्वीच घटनास्थळावरून टोईंग करून नेण्यात आली. तसेच, गौतमी पाटील या गाडीच्या मालक असूनही त्यांची अद्याप कोणतीही चौकशी झालेली नाही.
कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला असून, त्यांना पुरेसे सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर पुरावे मिळत नसल्याचे सांगितले आहे. प्रशासन थंड असल्याने आणि पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत, कुटुंबियांनी त्यांना मदतीपेक्षा न्यायाची गरज असल्याचे म्हटले आहे.
