Bachchu Kadu | प्रहारचा शिवसेना शिंदे गटामध्ये विलय?; बच्चू कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर सेनेला काय फायदा होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी आपला पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या राजकीय घडामोडींना वेग आला असून बच्चू कडू लवकरच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी आपला पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या राजकीय घडामोडींना वेग आला असून बच्चू कडू लवकरच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. तसेच पुढील सहा महिन्यांत त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर बच्चू कडूंना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण झाल्यास, विशेषतः विदर्भ आणि ग्रामीण भागात पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बच्चू कडू यांच्या आक्रमक शैलीमुळे शिवसेनेला एक प्रभावी चेहरा मिळू शकतो. ग्रामीण भागात प्रहारची मजबूत पकड असल्याने पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होऊ शकतो. विशेषतः अमरावतीसारख्या भागात शिवसेनेचे अस्तित्व मर्यादित असताना कडूंच्या एन्ट्रीमुळे पक्षाला परत चांगले दिवस येऊ शकतात, तसेच शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून बच्चू कडू ओळखले जातात. त्यामुळे या मुद्द्यांवर शिवसेनेला अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकूणच, या संभाव्य विलिनीकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, येत्या काळात या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
