Prasad Lad : माझं समर्थन पण, महाराष्ट्राची लोकं शिव्याशाप नाही तर इतिहास लक्षात ठेवतात, भाजप नेत्यानं जरांगेंना फटकारलं
मनोज जरांगे पाटलांनी कुणाच्या आईविषयी बोलावं ही शिवरायांची शिकवण नाही, असं वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी करत मनोज जरांगे पाटील यांच्यावरत हल्लाबोल केलाय
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या एल्गार आणि आंदोलनाला समर्थन असल्याचे भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे, उच्च न्यायालयात ते टिकवणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचं आहे. असा आशय लिहून भाजपच्या प्रसाद लाड यांनी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळतंय.
यासंदर्भात बोलताना प्रसाद लाड म्हणाले, मी स्वतः मराठा आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून हा देश महाराष्ट्र चालतो. तर मराठा समाजातील व्यक्ती म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने चालतो. अशा व्यक्तीने मुख्यमंत्र्याच्या आईबद्दल बोलावं अशी महाराजांची शिकवण नाही. प्रत्येक स्त्रीला आपल्या आईच्या नजरेनं पाहवं, अशी महाराजांची शिकवण आहे. मात्र जरांगेंनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली याचा निषेध करतो, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं तर महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, राज्याची एक परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोकं इतिहास लक्षात ठेवतात, शिव्याशाप नाही, असं म्हणत जरांगेंना प्रसाद लाड यांनी फटकारलंय.
