Chunabhatti Sion Protest : चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको, घडलं काय?
मुंबईतील चुनाभट्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना चैत्यभूमीकडे जाण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. रिक्षातून आलेल्या अनुयायांना पोलिसांनी अडवल्याने त्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको करत वाहतूक कोंडी केली. दरवर्षी परवानगी असूनही यंदा अडवल्याचा आरोप अनुयायांनी केला. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
मुंबईतील चुनाभट्टी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना दादरच्या चैत्यभूमीकडे जाण्यापासून रोखण्यात आल्याने गुरुवारी मोठा तणाव आणि गोंधळ निर्माण झाला. चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ पोलिसांनी रिक्षातून आलेल्या अनुयायांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली. या पोलीस कारवाईच्या विरोधात आंबेडकर अनुयायांनी संतप्त होऊन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून त्यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. याच परंपरेनुसार, रिक्षातून चैत्यभूमीकडे निघालेल्या भीम अनुयायांना चुनाभट्टी येथे अडवण्यात आले. रिक्षा चालकांनी आरोप केला आहे की, “आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षाने येतो, परंतु याच वर्षी आम्हाला अडवलं जात आहे.” यावरून पोलीस आणि भीम अनुयायी यांच्यात जोरदार वाद होऊन परिस्थिती तणावपूर्ण बनली.
