Kamal Khan Video : कमाल खानने मर्यादा ओलांडल्या, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरळला; ‘त्या’ वादग्रस्त पोस्टवरून मुख्यमंत्री आक्रमक
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विट करताना कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहे
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल खान पुन्हा एकदा बरळल्याचे पाहायला मिळालंय. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानने सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कमाल खानने विकिपीडियाचा आधार घेत त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली होती. जी आक्षेपार्ह असल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फडणवीसांनी विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे, त्याप्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर हटवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती तातडीने करावी, असे आदेश सायबर विभागाला दिलेत.
