CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी किती मदत देण्याचं ठरवलं? पुढच्या आठवड्यात घोषणा, नुकसानग्रस्त बळीराजासाठी फडणवीसांचे काय आदेश?
अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिके वाहून गेली असून, जनावरे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले असून, ओला दुष्काळ म्हणून सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिके उद्ध्वस्त झाली असून, जनावरे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी घोषणा केली आहे. तसेच, ओला दुष्काळ नसला तरी दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात या मदतीसंदर्भात घोषणा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मात्र, एकीकडे सरकार मदतीची घोषणा करत असताना, दुसरीकडे धाराशिव आणि हिंगोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांकडून नोटिसा येत आहेत. अनेकांची खाती गोठवण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना दैनंदिन गरजांसाठीही पैसे काढता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या खात्यातील नाफेडचे सोयाबीन विक्रीचे पैसेही काढता येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने या बँकांना वसुली थांबवण्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांची खाती पूर्ववत करावीत, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.
