Vijay Wadettiwar : संशय खरा ठरला, पुणे जमीन घोटाळ्यावर बोलतांना वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, म्हणाले पार्थ पवार…
विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत सरकारवर आरोप केले. या प्रकरणावरून जनतेचा संशय खरा ठरल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन प्रकरणावर गंभीर आरोप केले. जनतेचा संशय खरा ठरल्याचे सांगत, सरकारने नेमलेली चौकशी समिती केवळ क्लीनचिट देण्यासाठीच असते, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ‘पुणे जमीन प्रकरणी जनतेला जो संशय होता तो खरा ठरला, सरकारने फक्त चौकशीचा फार्स केला. या समितीवरच आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकार जी समिती नेमते त्यातून क्लिनचीट देण्याचाच उद्योग केला जातो. पुणे प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांच्या “उद्योगी” मुलाला वाचवण्याची सरकारची इतकी का धडपड सुरू आहे?’, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
पुण्याच्या जमिनीची न्यायिक चौकशी व्हायला हवी. पार्थ पवार याची कंपनी असून त्याच्यावर कारवाई होत नाही यातून चुकीचा पायंडा पडत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या कंपनीवर कारवाई व्हावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. भविष्यात हवी ती जमीन मंत्र्यांचे नातेवाईक लुटतील आणि सरकार क्लिनचीट वाटत बसेल हे थांबले पाहिजे, असेही ते म्हणाले.
