BSF jawan PK Sahu : चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला ‘तो’ जवान अखेर भारतात परतला; कुटुंबीयांच्या भावना अनावर, म्हणाले…
पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रहिवासी असलेला जवान पीके साहू हा १० एप्रिलपासून भारत-पंजाब सीमेवर एका पथकासोबत तैनात होता. यावेळी त्याच्याकडून चुकून सीमा ओलांडली गेली आणि तो पाकिस्तानच्या हद्दीत गेला. यावेळी त्याच्या अंगावर वर्दी होती.
बीएसएफ जवान पूर्णब कुमार साहू पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. यानंतर भारताने या जवानाच्या बदल्यात पाकिस्तानी रेंजर्सनाही परत केले आहे. बीएसएफ जवान पीके साहूला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले आहे. पीके साहू अटारी सीमेवरून परतला आहे. बीएसएफ जवान पीके साहू याने चुकून सीमा ओलांडली होती आणि जवळपास २० दिवस भारताचा जवान हा पाकिस्तानच्या हद्दीत होता. यानंतर, भारताने सुद्धा पाकिस्तानी रेंजर्सच्या एका जवानाला पकडलं होतं. आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सची देवाणघेवाण केली आहे. जवान आणि रेंजरची देवाणघेवाण करण्याची पूर्ण प्रक्रिया आज सकाळी १०.३० वाजता अटारी येथे झाल्याची माहिती मिळत आहे.
बीएसएफ जवान पीके साहू २३ एप्रिलपासून पाकिस्तानच्या ताब्यात होता. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील भारत-पंजाब सीमेवर पीके साहू नुकताच आपल्या कर्तव्यावर रुजू झाला होता. या जवानाने २३ एप्रिल रोजी झिरो लाईनजवळ शेतात काम करणाऱ्या सीमावर्ती शेतकऱ्यांना मदत करत असताना चुकून सीमा ओलांडली आणि पाकिस्तान सीमा सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेतले. मात्र आता पाकिस्तानने त्याला भारताकडे सोपवले आहे. यानंतर कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
