Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
राज्यात अवकाळी हवामानाचा कहर सुरू असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील खंडाळा गावाला चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत अनेक भागांना झोडपून काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या खंडाळा गावात आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, घरामध्ये साठवून ठेवलेले अन्नधान्यही पावसाच्या पाण्यामुळे भिजले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कळंब, तुळजापूर, वाशी आणि भूम तालुक्यांमध्ये पावसाने दमदार बॅटिंग करत जनजीवन विस्कळीत केले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा मंदावल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.