बेलगाम वर्तन करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा..; रोहित पवारांची पत्रकार परिषदेत टीका
आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने गोळीबार करून धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. या गोळीबारात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी रोहित पवार यांनी दुसऱ्या एका ट्विटद्वारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, CID, CBI किंवा अगदी इंटरपोलमार्फत चौकशी केली तरी विधानसभेत महत्त्वाच्या चर्चेदरम्यान कृषिमंत्री पत्ते खेळत असल्याचे सत्य बदलणार नाही. त्यामुळे बेलगाम वर्तन करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी संपूर्ण राज्यातील जनतेची भावना आहे. मात्र, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना या राजकीय अपरिहार्यतेचे नेमके कारण काय, हे समजत नाही. राजकीय अपरिहार्यता असू शकते, पण ती जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल इतकी नसावी, असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी, हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये सुचवले आहे.
