Ajit Pawar : ‘स’चा झाला ‘च’ अन् राजकारण पेटलं, धीरूभाई अंबानी पेट्रोल चोर? अजितदादा नेमकं काय म्हणाले? ज्याची होतेय चर्चा
पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले असं अजित पवार म्हणाले होते. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र अजित पवारांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं. अजित पवार पेट्रोल सोडून असं म्हणाले मात्र सोशल मीडियावर चोरून असं वक्तव्य व्हायरल होत आहे.
अजित दादांच्या धीरूभाई अंबानींवरच्या वक्तव्यावरून सध्या राजकारण पेटलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं. धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला. सोशल मीडियात स चा च झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं. अजित दादांचं हे वक्तव्य अंजली दमानियांनी ट्विट करत टीका केली आणि त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं.
वार-पलटवार नेमका काय?
‘पंपावर पेट्रोल चोरून अंबानी कोट्यधीश झाले आणि तुम्ही सिंचन घोटाळा, एमएसईबी घोटाळा करून काय केलं’, असा सवाल अंजली दमानियांनी या ट्विटद्वारे विचारला तर यावर सुरज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. मराठीमध्ये एक म्हण आहे ध चा म करणं तसं इथे स्वयंघोषित समाजसेविकेनं व्यक्तीद्वेषापोटी सोडूनला चोरून केलंय. एकूणच स चा च झाल्यानं अजित पवारांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात सध्या हंगामा झाला आहे.
