Eknath Shinde : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शिंदेंकडून हालचाली सुरु, लवकरच…. उदय सामंतांवर मोठी जबाबदारी
मनसेसोबत युती करायची की नाही, यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचे समजतेय. यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडून मुंबई माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आलेली आहे. याबद्दलची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अशातच ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चांदरम्यान, एकनाथ शिंदेंची एन्ट्री पाहायला मिळाली.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ते राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती असून शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांच्यावर यासंदर्भातील विशेष जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची वांद्रयाच्या ताजमध्ये भेट झाली. अशातच ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा होत असताना एकनाथ शिंदे यांची एन्ट्री झाल्याची माहिती आहे.
