Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व करत एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक कल्याण योजनांपर्यंत विविध क्षेत्रांतील बदलांची माहिती आकडेवारीसह दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे देशाचे नेतृत्व करत एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीपासून ते सामाजिक कल्याण योजनांपर्यंत विविध क्षेत्रांतील बदलांची माहिती आकडेवारीसह दिली.
फडणवीस यांनी सांगितले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून देशाचा आर्थिक विकासदर 7 टक्क्यांहून अधिक आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले आहे. देशाची अर्थव्यवस्था 345 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, भारताकडे सध्या 67 लाख कोटी रुपयांचा विदेशी चलनसाठा उपलब्ध आहे. या साठ्याच्या बळावर देश पुढील 11 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवू शकतो. तसेच भारतावरील विदेशी कर्जापैकी 94 टक्के कर्ज परतफेड करण्याची क्षमता आज देशाकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
डिजिटल व्यवहारांमध्ये झालेल्या वाढीचाही त्यांनी उल्लेख केला. यूपीआयच्या माध्यमातून 314 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत असून, भारताने या क्षेत्रात चीनलाही मागे टाकल्याचे ते म्हणाले. जगातील 30 हून अधिक देश यूपीआय प्रणालीचा वापर करत असून ब्राझीलदेखील या प्रणालीकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रातील योजनांचा आढावा घेताना फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यकाळात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले. 81 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा, 60 कोटींहून अधिक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण, तसेच 58 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा वाढवणे, दुग्ध उत्पादनात 70 टक्क्यांची वाढ आणि मध्यमवर्गीयांसाठी आयकर सवलतीची मर्यादा वाढवण्यासारखे अनेक निर्णय मोदी सरकारच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण उपलब्धी असल्याचे सांगत फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा गौरव केला.