Dombivli Video : बाप कोण असतं दाखवू का? खाकी वर्दी दारूच्या नशेत, मागितला 20 रूपयांचा हफ्ता…मनसेनं भररस्त्यात घातला गोंधळ
डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा दारूच्या नशेत हप्ते घेतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनसेने या प्रकरणी तीव्र आक्षेप घेत पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे. पोलिसांनी याला मनसेची स्टंटबाजी म्हणत योग्य चौकशीचे आश्वासन दिले आहे.
डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्याचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला या संदर्भात जाब विचारला, ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
मनसेने केलेल्या आरोपानुसार, संबंधित पोलीस हवालदार छोट्या धंदेवाल्यांकडून आणि वाहनचालकांकडून वीस रुपये तसेच मासिक तीनशे रुपयांपर्यंत हप्ते मागतो. ही बाब गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषण करण्यात येईल.
या आरोपांवर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी या घटनेला मनसेची स्टंटबाजी असे संबोधले असले तरी, या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
