बैलगाडा शर्यतींना अखेर सशर्त परवानगी, सांगलीतील झरे गावातून Gopichand Padalkar
बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा मुद्दा लावून धरणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर सांगलीतील झरे गावात जंगी मिरवणूक काढली. यावेळी पडळकर बैलगाडा हाकताना दिसून आले.
सांगली : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर सर्वत्र या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा मुद्दा लावून धरणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर सांगलीतील झरे गावात जंगी मिरवणूक काढली. यावेळी पडळकर बैलगाडा हाकताना दिसून आले. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना अनेक शर्यती काढल्याप्रकरणी अनेक जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांबाबत राज्य सरकार आता काय निर्णय घेणार का? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
सर्वोच्च न्यायलयाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनीही स्वागत केले आहे. 2011 पासून बैलगाडा शर्यतीवरून बंदी होती. बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्याने अनेक बैल कत्तलखान्याकडे गेले, त्यामुळे गायींची संख्याही कमी झाली. आजपासून बैलांच्या किंमती दुपटीने, तिपटीने वाढल्या अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. बैलगाडा शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शर्यतीच्या एका बैलगाड्यामागे 20 ते 25 तरुणांना काम मिळते, त्यामुळे मोठ्य प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी प्रतिक्रियाही गोपीचंद पडळकरांनी दिली आहे.
