Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम; पंढरपूरच्या भीमेतील मंदिरं पाण्यात, कुठं पूर तर कुठं गावांचा संपर्क तुटला अन्..

Maharashtra Rain : पावसाचा जोर कायम; पंढरपूरच्या भीमेतील मंदिरं पाण्यात, कुठं पूर तर कुठं गावांचा संपर्क तुटला अन्..

| Updated on: Jul 29, 2025 | 10:26 AM

खडकवासला धरणातून मुठा नदीत सध्या 28 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 65% जलसाठा असून 60% जलसाठा झाल्यानंतर विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

राज्यातील मुसळधार पावसानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत केले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली आणि त्यामुळे पुण्यातील एकता नगरमधील सोसायटीमध्ये पाणी शिरले. खबरदारी म्हणून महापालिकेकडून नदीच्या कडेला मातीचा बांध घालून भराव करण्यात आलाय. खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यास आज 10 वाजल्यापासून विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार अशी माहिती पाटबंधारे विभागाची आहे. उजनीतून 71 हजार तर वीर धरणातून 31 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. एक लाखापेक्षा जास्त विसर्ग होत असल्याने भीमा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेले. धरणातील विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना पुराचा धोका निर्माण झाला असून कोल्हापूर सांगली आणि पंढरपूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर कोयना चांदोलीतील विसर्गामुळे कृष्णा वारणा तर राधा नगरीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रामसगावमधील पूल पाण्याखाली गेला आहे. घनसावंगी तालुक्यातील सात गावांचा यामुळे संपर्क तुटलेला आहे. यासह भोकरधन तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसामुळे गिरजा नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तर खरीप हंगामातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.

Published on: Jul 29, 2025 10:26 AM