Kalyan : … नाहीतर आडवे करू, शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा स्वबळाचा नारा, थेट महायुतीलाच ओपन चॅलेंज, राजकीय वर्तुळात खळबळ
कल्याणमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. युती झाली नाही तरी आम्ही स्वतःच लढायला तयार आहोत, असे मोरे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागात धनुष्यबाणाच्या निशाणीवर उमेदवार निवडून आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सर्व प्रतिस्पर्धकांना खुले आव्हान दिले आहे.
कल्याणमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अरविंद मोरे यांनी स्पष्ट केले की, युती होवो अथवा न होवो, शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढण्यास पूर्णपणे सज्ज आहे. “याल तर सोबत, नाहीतर आडवे करू,” अशा शब्दांत त्यांनी युतीतील भागीदारांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.
आम्ही स्वतः लढायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना असे वाटत असेल की युतीशिवाय काम करणे शक्य नाही किंवा युतीशिवाय निवडून येऊ शकत नाही, त्यांना मोरे यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. युतीचा निर्णय भविष्यात होईल, परंतु प्रत्येक प्रभागात आपला प्रतिनिधी निवडून येणे महत्त्वाचे आहे, असे मोरे यांनी नमूद केले. या भूमिकेमुळे कल्याणमधील स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता आहे.
