Sambhajinagar Muncipal Election : संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. स्ट्रॉंग रूम उघडल्या असून, ईव्हीएम मशीन केंद्रांवर पोहोचल्या आहेत. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सत्ता कोणाकडे जाते हे आज स्पष्ट होईल. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे स्टेडियम केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच गोंधळ झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित मतमोजणीला आता काही मिनिटांत सुरुवात होणार आहे. अंधेरीसह मुंबईतील एकूण 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे, ज्यासाठी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्या असून ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रांवर पोहोचल्या आहेत. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतं मोजली जातील. प्रत्येक केंद्रावर दोन टेबलवर मतमोजणी होणार असून, प्रत्येक टेबलवर 15 मशीनद्वारे पहिला राऊंड मोजला जाईल. या विशेष पद्धतीमुळे दोन-दोन वॉर्डचे निकाल लवकर जाहीर होणार आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे जाते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. ही निवडणूक केवळ मुंबईसाठीच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे बंधू, अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरवणारी ठरणार आहे. ही निवडणूक धर्म, भाषा, अस्मिता आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली गेली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. गरवारे स्टेडियम केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांसोबत बाचाबाची झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
