Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले…

Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले…

| Updated on: May 29, 2026 | 4:03 PM

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असून, त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असून, त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा समावेश आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीनंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीकडे रवाना होऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, “चर्चेला शिष्टमंडळ येऊद्या, पण मी उपोषणावर ठाम आहे,” अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “उपोषण करणे हा पाटलांचा अधिकार आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चेनंतर त्यांचं समाधान होईल, असा मला विश्वास आहे.” तसेच काही अधिकाऱ्यांविरोधात वैधता प्रमाणपत्र असूनही दाखले न दिल्याच्या तक्रारी आल्याचं त्यांनी सांगितलं. “आज आम्ही या सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहोत आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत,” असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं असून सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: May 29, 2026 4:03 PM
Follow Us