Sanjay Shirsat : शिंदेंचा मंत्री गोत्यात येणार? शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे, रोहित पवारांचा आरोप काय?
नवी मुंबईतल्या जमिनीच्या व्यवहारवरून पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप रोहित पवारांनी मंत्री शिरसाट यांच्यावर केला होता. त्यानंतर पुरावे द्या असं आव्हान शिरसाटांसह मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलं होतं. तर रोहित पवारांनी चक्क बॅग भरून बारा हजार पानी पुरावे सादर केलेत
सिडकोचे अध्यक्ष असताना सरकारच्या ताब्यातील १५ एकर जमीन शिरसाठांनी बिवलकरांना ५०० कोटी घेऊन परत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोप न करता पुरावे सादर करा असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिरसाटांना डिवचण्यासाठी बॅग भरून रोहित पवारांनी पुरावे सादर केले. बारा हजार पानांचे पुरावे सादर करत असून मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली.
गेल्या आठवड्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नवी मुंबईतल्या सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. ज्यात भूखंडाच्या व्यवहाराला स्थगिती देण्यासंदर्भातलं निवेदन दिलं. १५ एकरच्या जमिनीत सरकारचं पाच हजार कोटींचं नुकसान आणि दहा टक्के प्रमाणे शिरसाटांनी ५०० कोटी खाल्ले त्यातील साडेतीनशे कोटी पक्षाला पार्टी फंड दिला असाही आरोप रोहित पवारांचा आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंना यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला पण प्रतिक्रिया देण्यास शिंदेंनी टाळाटाळ केली.
दरम्यान, आधीच मंत्री शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना शिरसाट बॅगवरून चर्चेत आले. छत्रपती संभाजी नगरमध्ये गणेश मंडळांना डीजे ऐवजी चांगला बँड मागवा, असं आवाहन करतानाच शिरसाट बॅगवर आले. पैशांच्या उघड्या बॅगेसह शिरसाट व्हायरल झाले होते आणि त्यातच पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य करून शिरसाटांनी वाद ओढावून घेतला.
