Jayant Patil : तमाशाचा नाद… भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी… जयंत पाटलांचा हल्लाबोल
पालिका निवडणुकीतील बंडखोरीमुळे भाजपने मुंबई, नागपूर, सोलापूर येथे ८६ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. यावर जयंत पाटील यांनी भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याचे म्हटले. या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत जयंत पाटलांवरच निळू फुले यांच्या भूमिकेसारखी अवस्था झाल्याची टीका केली.
महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांमध्ये भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पक्षाने कठोर कारवाई केली आहे. मुंबईत २६, नागपूरमध्ये ३२ आणि सोलापूरमध्ये २८ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अधिकृत उमेदवारांना सहकार्य न करणे आणि त्यांच्या विरोधात लढणे, हे या निलंबनाचे मुख्य कारण आहे. सुनील अग्रवाल आणि धीरज चव्हाण यांचा निलंबन झालेल्यांमध्ये समावेश आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील यांनी भाजपची सध्याची अवस्था प्रसिद्ध पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याचे म्हटले. “तमाशा बंद करायला गेले आणि आता सर्वात पुढे तुणतुण घेऊन उभे आहेत,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
जयंत पाटील यांच्या या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, “स्वतः जे तुणतुण हातामध्ये घेऊन फडावर उभे आहेत, त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे.” बंड यांनी जयंत पाटील यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी साकारलेल्या भूमिकेसारखी झाल्याचे सांगत, त्यांनी इतरांवर टीका करू नये असा सल्ला दिला. या राजकीय शाब्दिक युद्धामुळे महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी तापले आहे.
