ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, शिंदे सेनेच्या बड्या मंत्र्यानं सांगितला नेमका काय गेम होणार?
उदय सामंत यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महायुती झाल्याची घोषणा केली. त्यांनी ठाकरे गटाने मनसेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत ४३-४५ जागा मिळाल्याचे सांगितले. तसेच, पुणे आणि इतर ठिकाणी जागावाटपावरून असलेले गैरसमज दूर करत महायुती महाराष्ट्रात एकसंध असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महायुतीच्या स्थितीवर भाष्य केले. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात महायुती निश्चित झाल्याची त्यांनी माहिती दिली. या महायुतीत भाजपने १३७ जागांवर, तर शिवसेनेने ९० जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सामंत यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका करत म्हटले की, ठाकरे गट मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, हे मी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते.
मनसेला हव्या असलेल्या जागा न मिळाल्याने, त्यांना केवळ ४३ ते ४५ जागा मिळाल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने उठाव का केला, याचे उत्तर मिळाले आहे, असेही सामंत म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्रितपणे लढत असून, कुठेही युती तुटलेली नाही. पुणे आणि इतर ठिकाणच्या स्थानिक मतभेदांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
