Nitesh Rane : पण आता ती वेळ आलीये, काही गोष्टी बोलल्या नाही तर…, पराभवानंतर नितेश राणे थेट चव्हाण यांच्या भेटीला
मंत्री नितेश राणे यांनी ट्वीट करत "पक्ष आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी आतापर्यंत गप्प होतो, पण आता वेळ आली आहे" असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सिंधुदुर्गमधील नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर आणि शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळाल्यानंतर राणेंचे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच ट्वीट करून म्हटले आहे की, ते आतापर्यंत “पक्षाच्या, नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प” होते. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे की, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे. काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात, असेही नितेश राणे यांनी नमूद केले आणि “आता ती वेळ आली” असे सूचित केले आहे.
नितेश राणे यांच्या या वक्तव्याला कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली या दोन महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये भाजपला अनपेक्षित धक्का बसला आहे. या नगरपरिषदांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
या निकालाने मंत्री नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या निकालानंतर नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या राणे बंधूंच्या लढाईमध्ये निलेश राणे यांची सरशी झाल्याचेही चित्र दिसत आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः कोकणात कोणत्या घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
