Mumbai Civic Polls : पालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं, काय झाली चर्चा?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पाच तास चर्चा होऊन २०० जागांवर सहमती झाली. उर्वरित २७ जागांवर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. महायुती १५० हून अधिक जागा जिंकून आपला महापौर निवडून आणण्याचा संकल्प करत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल पाच तास मॅरेथॉन बैठक सुरू होती. या बैठकीत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) रिजनमधील पालिकांसाठी सखोल चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पालिकेच्या २२७ जागांपैकी २०० जागांवर महायुतीची सहमती झाली आहे. उर्वरित २७ जागांवर एक ते दोन दिवसांत चर्चा पूर्ण होण्याची शक्यता आहे. महायुती ४८ तासांत मुंबई पालिकेसाठी उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिंदे शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, दोन दिवसांत उमेदवारांवरही चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीपूर्वी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत तीन तासांपेक्षा जास्त वेळ बैठक झाली होती. महायुती मुंबईत १५० पेक्षा जास्त जागा जिंकून आपला महापौर विराजमान करण्याचा संकल्प करत आहे.
