Mahayuti Tensions: महाराष्ट्रात खटके, बिहारमध्ये CM नितीश.. अन् शिंदे तडका-फडकी दिल्लीत, शहांसोबत 50 मिनिटं काय झाली चर्चा?
भाजपकडून होणाऱ्या इनकमिंगमुळे शिंदे गट नाराज असताना एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. बिहारमध्ये नितीश कुमार यांना कमी जागा असतानाही मुख्यमंत्रीपद मिळाल्याने, महाराष्ट्रात शिंदे गटाच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीची आणि महायुतीतील अंतर्गत खडाजंगीची चर्चा रंगली आहे. हा दिल्ली दौरा त्याच अनुषंगाने झाल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या नगरसेवकांची होणारी फोडाफोडी हे या नाराजीचे मुख्य कारण मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली, ज्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागे बिहारमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ जोडला जात आहे. बिहारमध्ये कमी जागा असूनही नितीश कुमार यांना भाजपने पुन्हा मुख्यमंत्रीपद दिले.
महाराष्ट्रात मात्र शिंदे गटाला निकालानंतर किमान वर्षभर मुख्यमंत्रीपद मिळावे ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे नितीश कुमार यांच्याप्रमाणेच शिंदेही दिल्लीत काही राजकीय आश्वासनांच्या शोधात होते का, अशी अटकळ बांधली जात आहे. महायुतीतील हा संघर्ष उल्हासनगर आणि डोंबिवली येथील नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणातून अधिक गडद झाल्याचे दिसते. शिंदे गटातील मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्याचेही समोर आले. मात्र, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी हे मतभेद नसून संवाद असल्याचे स्पष्ट करत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे असल्याचे सांगितले.
