मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. आलोक कुमार सिंग असे मृत प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी जलद तपास करत संशयित आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला कुराड व्हिलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
मालाड रेल्वे स्थानकावर २४ तारखेला सायंकाळी एका चर्चगेट-बोरिवली स्लो लोकल ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. ही घटना सायंकाळी १७:४० वाजता प्लॅटफॉर्म नंबर एक-दोनवर घडली. गाडीतून उतरण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून संशयित आरोपीने आलोक कुमार सिंग नावाच्या प्रवाशाच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या आलोक कुमार सिंग यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात ८१/२६ कलम १०३ नुसार हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. रेल्वे पोलीस आयुक्त श्री राकेश कलासागर आणि डीसीपी श्रीमती सुनीता साळुंखे ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताला मालाड आणि कुराड परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
