Dinkar Patil : राज ठाकरे यांच्यावर माझी नाराजी नाही, पण…. मनसेतून भाजपवासी दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
नाशिकचे मनसेचे हेविवेट नेते दिनकर पाटील यांनी तीन नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज ठाकरे किंवा मनसेवर कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत, केवळ नाशिकच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षांतरामागे अन्य कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी वारंवार सांगितले.
नाशिकच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नाशिकचे तीन नगरसेवक – अमोल पाटील, रवींद्र धिवरे, लता पाटील आणि संगीता बाळासाहेब गोटेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षबदलामागे केवळ आणि केवळ विकासाचे मुद्दे असल्याचे दिनकर पाटील यांनी वारंवार सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी राज ठाकरेंवर नाराज नाही. कोणावरही माझी नाराजी नाही. फक्त विकासासाठी आम्ही चाललेलो आहोत,” असे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले. मनसेमध्ये त्यांना मोठे पद देण्यात आले होते, राज ठाकरे यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती आणि ते मनसेच्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेत होते, असे पत्रकारांनी विचारल्यावरही त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवला. विधानसभा निवडणुकीतही त्यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली होती, याची आठवण करून दिल्यावरही त्यांचे उत्तर फक्त विकासासाठी असेच होते.
