MNS Raj Thackeray : फक्त ‘त्या’ 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा… ठाकरे बंधू एकत्र येताच 11 पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची सोडली साथ
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. वांद्रे प्रभागातील ११ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. मनासारखी उमेदवारी न मिळाल्याने किंवा जागा वाटपावरून झालेल्या नाराजीमुळे हे राजीनामे देण्यात आले आहेत, ज्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या संकेतामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मधील मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी केवळ दोन वाक्यांमध्ये आपला राजीनामा देत, “१९ वर्ष आणि ९ महिन्यांच्या अविस्मरणीय राजकीय प्रवासाला अखेरचा जय महाराष्ट्र” असे म्हटले आहे. उमेदवारी मिळाली नाही किंवा आपल्या प्रभागात पक्षाचा उमेदवार मिळाला नाही, तसेच मनसेला मिळणारी जागा ठाकरेंना (उद्धव ठाकरे गट) देण्यात आल्याने ही नाराजी समोर आल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या नेत्यांकडून आणि स्वतः राज ठाकरे यांच्याकडून या नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
