Raj Thackeray :  कोण कोणाचे वडील? कोणी कुणाला काढलंय… राज ठाकरेंनी थेट पुरावा दाखवत कसा होतो घोळ सगळंच सांगितलं

Raj Thackeray : कोण कोणाचे वडील? कोणी कुणाला काढलंय… राज ठाकरेंनी थेट पुरावा दाखवत कसा होतो घोळ सगळंच सांगितलं

| Updated on: Oct 15, 2025 | 2:09 PM

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमधील मोठ्या घोळावरून टीका केली. वयोमानातील अवास्तव त्रुटी दाखवत, याद्या दुरुस्त होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना याद्या तपासण्यासाठी दिलेली आठ दिवसांची मुदतही अव्यवहार्य असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला. कोण कोणाचे वडील हेच मतदार याद्यांमधून कळत नाही असे म्हणत, त्यांनी मतदार यादीत आढळलेल्या अनेक अवास्तव नोंदींची उदाहरणे दिली.

कांदिवली पूर्व मतदारसंघात २३ वर्षांच्या धनश्री कदम यांच्या वडिलांचे नाव दीपक कदम, वय ११७ वर्षे, तसेच चारकोप मतदारसंघात नंदिनी चव्हाण यांच्या वडिलांचे वय १२४ वर्षे असल्याच्या नोंदी त्यांनी सादर केल्या. या घोळाकडे लक्ष वेधत, जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे सुधारल्या जात नाहीत, तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

विशेषतः गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदार याद्यांच्या दुरुस्तीशिवाय घेऊ नयेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. राजकीय पक्षांना आठ दिवसांत याद्या तपासण्यासाठी दिलेल्या मुदतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत, ती रद्द करण्याची मागणी केली. या गंभीर विषयावर सर्व राजकीय पक्ष मिळून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

Published on: Oct 15, 2025 02:09 PM