Raj Thackeray : चित्रपट बघायचा असेल तर… राज ठाकरेंकडून ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चं तोंडभरून कौतुक, बघा नेमकं काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे कौतुक केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन नागरिकांना केले. आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण, सत्ताधाऱ्यांचा विकास आणि शेतकऱ्यांची हतबलता या चित्रपटात मांडल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवावी, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका फेसबुक पोस्टद्वारे महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. त्यांनी नागरिकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले. राज ठाकरे यांच्या मते, आजच्या परिस्थितीवर आधारित खरा आणि समकालीन चित्रपट बघायचा असेल तर पुन्हा शिवाजीराजे भोसलेला पर्याय नाही. आजकाल विकास म्हणजे केवळ मोठे महामार्ग, पूल आणि आकर्षक घोषणा अशी संकल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यात कोणाचा विकास होतो की नाही, हे माहीत नसले तरी सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था त्यांनी अधोरेखित केली, जिथे एका बाजूला पाऊस झोडपतो तर दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने त्यांना त्रास देते. या चित्रपटातून महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि लेखक यांनी समाजातील ही चीड आणि अस्वस्थता प्रभावीपणे मांडली आहे. हा केवळ एक चित्रपट नसून, या टीमच्या मनातील अस्वस्थतेचे ते प्रतिबिंब आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने ही अस्वस्थता अनुभवायला हवी, असे आवाहन करत त्यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आवर्जून पाहण्यास सांगितले आहे.
