आज ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
मध्य रेल्वेने मुंबईतील मुख्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंग्या ते मुलुंड दरम्यान, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत राहील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वेने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मुंबईतील मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना रविवारी काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मुख्य मार्गावर माटुंग्या ते मुलुंड दरम्यान सकाळी 11:00 वाजल्यापासून दुपारी 3:20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक ते चुनाभट्टी दरम्यान तसेच वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11:40 पासून संध्याकाळी 4:40 मिनिटांपर्यंत चालेल. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक आठ दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा मेगाब्लॉक विविध अभियांत्रिकी कामे, देखभाल आणि डागडुजीसाठी आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे, असे आवाहन मध्य रेल्वेने मुंबईकरांना केले आहे.
