Temperature | उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही, हवामान विभागाचा मोठा इशारा
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असताना अद्याप पावसाची कोणतीही ठोस चिन्हं दिसत नाहीत. उलट हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणासाठी उष्णतेचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असताना अद्याप पावसाची कोणतीही ठोस चिन्हं दिसत नाहीत. उलट हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणासाठी उष्णतेचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. दमट हवामान आणि प्रचंड उकाड्यामुळे मुंबईकर अक्षरशः घामाघूम झाले असून पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाणे परिसरात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुंबईतील तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. कुलाबा येथे 35.2 अंश तर सांताक्रूझमध्ये 35.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भायखळा येथे तापमान 37.8 अंशांपर्यंत पोहोचलं असून राम मंदिर परिसरात तब्बल 38.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. विक्रोळी, वरळी आणि चेंबूर भागातही तापमान 36 अंशांच्या पुढे गेल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात आणखी वाढ झाली असून मान्सूनपूर्व पावसाला विलंब होत असल्याने नागरिकांना आणखी काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं आणि उष्माघात टाळण्यासाठी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
