नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात साचलं पाणी, वाहतूकही ठप्प
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच मुंबईत पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून शहरातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईच्या उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दादर, प्रभादेवी, लालबाग आणि कुर्ला परिसरातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली. कुर्ल्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, अंधेरी, मालाड तसेच इतर उपनगरांमध्ये पहिल्याच पावसाच्या सरीत वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णता आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
