VIDEO : उघड्या मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्या, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

| Updated on: Jun 10, 2021 | 5:04 PM

भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक या मॅनहोलमध्ये पडल्या.

Follow us on

मुंबई : मुंबईतील पावसाने काल दाणादाण उडवून दिली. भांडुपमध्ये तर दोन महिला अक्षरश: मृत्यूच्या दारातून परतल्या. झाकण उघडं असल्याने या महिला मॅनहोलमध्ये पडल्या. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. भांडुप विलेज रोडवर पाणी साचल्याने फुटपाथवरील मॅनहोलचे झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं. मात्र पावसाच्या पाण्यामुळे उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने दोन महिला त्यामध्ये पडल्या. आधी एक महिला पडली. त्यानंतर काही वेळाने मागून आलेली महिला अंदाज चुकल्याने मॅनहोलमध्ये कोसळली. (Mumbai rains update two woman falls in open manhole near bhandup Mayor Kishori Pednekar visited the site today)

भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या. त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक या मॅनहोलमध्ये पडल्या. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता, त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कमी होता. त्यामुळे या महिला बचावल्या.

काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका आशा कोपरकर यांनी मनपावर आरोप केलाय की या मेनहोलसंबंधी तक्रार त्यांनी स्थायी समिती आणि एस वॉर्डात केली. पण त्यावर कुणीही लक्ष दिलं नाही.

दरम्यान, भाजप खासदार मनोज कोटक यांनी याप्रकरणी मनपावर हल्लाबोल केला. मनपाकडून लोकांच्या जीवाचा खेळ सुरू असल्याचा आरोप.

महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी

याप्रकरणानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भर पावसात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

(Mumbai rains update two woman falls in open manhole near bhandup Mayor Kishori Pednekar visited the site today)