तपोवन सुंदर आहे…फक्त ‘हे’ बोलले पाहिजेत

| Updated on: Dec 07, 2025 | 3:18 PM

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध राजकीय पक्ष एकवटले आहेत. सरकारचा निर्णय, विशेषतः भाजपचा वृक्षतोडीला पाठिंबा, यामुळे सर्व पक्ष विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्री गिरीश महाजनांनी १५,००० झाडे लावण्याचे आश्वासन दिले असले तरी, स्थानिक नागरिक तपोवनाला नाशिकचे फुफ्फुस मानत एकही झाड तोडू न देण्याचा निर्धार करत आहेत.

नाशिकच्या ऐतिहासिक तपोवनात झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. हजारो नाशिककर, पर्यावरण प्रेमी आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह (मनसे) काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेनेच्या नेत्यांनीही झाडे तोडण्यास विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावर सध्या “सर्व पक्ष विरुद्ध भाजप” असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे, कारण फक्त भाजपचे नेते वृक्षतोडीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.

संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनावरही नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हैदराबादमधून १५,००० देशी झाडे आणून नाशिकमध्ये लावण्याचे नियोजन सांगितले आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की, तपोवनातील झाडे तोडून मोठे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा डाव आहे. नाशिककर हे तपोवन नाशिकचे फुफ्फुस मानतात आणि त्यांनी एकही झाड तोडू न देण्याचा निर्धार केला आहे.

Published on: Dec 07, 2025 03:17 PM