Jitendra Awhad : नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांनी आव्हाडांना गाडीखालून खेचत काढलं बाहेर, रात्री काय घडलं?
आव्हाडांनी दिलेल्या मंगळसूत्र चोर या घोषणेनंतर त्यांचा पडळकर यांच्यासोबतचा वाद वाढला होता. त्यानंतर विधानभवनाच्या लॉबीमध्येच पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. या प्रकाराने राज्यात वातावरण तापलंय.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेत. पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाडांनी ठिय्या आंदोलन केलं. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली. पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचून बाहेर काढल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस नितीन देशमुख यांना घेऊन गेलेत. हा सगळा प्रकार विधानभवन रात्री बारा ते दीडवाजेदरम्यान घडला. साधरण तासभर हे ठिय्या आंदोलन सुरू होतं.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच काल पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनात जोरदार हाणामारी झाली आहे. विधानभवनात झालेल्या या हाणामारीचे प्रकरण चांगलेच तापले आहे.
