NCP : काकाची पुण्याई गळ्याची आण खोटं बोलत नाही! झालं गेलं गंगेला मिळालं आता… दादांचं दोन्ही NCP च्या मनोमिलनावर भाष्य

| Updated on: Jan 08, 2026 | 11:22 AM

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. अजित पवार शरद पवारांना दैवत मानत असले तरी एनडीए सोबत राहण्याचा दावा करतात. ही आघाडी राज्यभर पसरणार का, अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार की शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार, हे मुख्य प्रश्न आहेत.

पुण्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. अजित पवारांनी “झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय” असे म्हणत संभाव्य एकत्रीकरणाचे संकेत दिले. मात्र, या संभाव्य एकत्रीकरणात एक विरोधाभास दिसून येतो. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र आल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी शरद पवारांना दैवत मानत असतानाही एनडीए सोबतच राहणार असल्याचे म्हटले आहे.

यामुळे दोन्ही राष्ट्रवादी फक्त पुण्यापुरत्या एकत्र आल्या आहेत की राज्य पातळीवरही एकत्र येणार, आणि जर राज्यपातळीवर एकत्र आल्या तर अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार की शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत एनडीएत सामील होणार, हा मुख्य मुद्दा आहे. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरून भाजपलाच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे, तर भाजपने त्यांना असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही नवी गुंतागुंत आगामी काळात काय रूप घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Published on: Jan 08, 2026 11:22 AM