Dilip Walse Patil | कांदा आंदोलनावर वळसे पाटलांचा मोठा प्रस्ताव; ‘या, चर्चा करू’ म्हणत आंदोलनकर्त्यांना खुलं आवाहन!

| Updated on: Jun 02, 2026 | 10:27 AM

राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर असून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर असून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आंदोलन करणाऱ्यांनी सरकारच्या प्रयत्नांचा विचार करावा आणि आणखी सुधारणा आवश्यक असल्यास त्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आंदोलनकर्त्यांनी आंदोलनानंतर माझी भेट घेतली तर त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करता येईल. तसेच मला आंदोलनस्थळी बोलावले तरी कोणताही पूर्वग्रह न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास मी तयार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत,” असे वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आगामी हवामान परिस्थितीबाबतही शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून एल निनोचा प्रभाव वाढल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना ऊस, कांदा आणि इतर नगदी पिकांबाबत हवामान आणि बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आखाती प्रदेशातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून त्याचा प्रभाव भारतासह महाराष्ट्रावरही जाणवू शकतो, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Published on: Jun 02, 2026 10:27 AM
Follow Us