Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदारांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आपल्या अध्यात्मात सांगितले आहे की, दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारा एक दिवस स्वतःही त्यात पडतो.”
पुढे बोलताना त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. “24 ऑक्टोबर 2019 रोजी भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते. भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली,” असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
“जशी कृती केली जाते, तसेच परिणाम आणि संस्कार समोर येतात. त्यामुळे आज जे काही घडत आहे, त्याकडे त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या चर्चांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.