Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. आंदोलन संपल्यानंतर आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडण्यात आल्याची घटना समोर आली असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील मागण्यांसाठी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. आंदोलनादरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनीही भेट दिली होती. दरम्यान, सरकारकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली होती आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली होती.
मात्र आंदोलन संपल्यानंतर भाजप किसान मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडत निषेध नोंदवला. आंदोलनामुळे पंढरपूरचे वातावरण अशुद्ध झाल्याचा दावा करत संबंधितांनी आंदोलनात सहभागी झालेल्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाल्याचाही आरोप करण्यात आला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी भाजपवर टीका केली. “गोमूत्र शिंपडून नेमके काय सिद्ध करायचे आहे, याचा विचार भाजप नेतृत्वाने करायला हवा. राज्यातील आणि देशातील गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी अशा प्रकारच्या कृतींना प्रोत्साहन दिले जात आहे,” असे त्या म्हणाल्या.
तसेच रोहित पवार यांचे आंदोलन हे कोणत्याही राजकीय हेतूने नव्हते, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते, असे सांगत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शरद पवार यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केले असून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंढरपूरातील राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.