Pune : रूमवर पोरं अन् किती मुलांसोबत…लाथा-बुक्के… कोथरूड पोलिसांवर ‘त्या’ तरूणींचे आरोप काय?
पुण्यातील तीन तरुणींनी कोथरूडच्या पोलीसांवर जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप केलाय. पोलिसांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी सुद्धा ठिय्या आंदोलन केलं होतं. मात्र तरुणींचा आरोप सिद्ध होत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे?
पुण्यातील कोथरूड पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तीन तरुणींनी केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या एका महिलेला मदत केल्याने घरात शिरून पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्ष विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली. या पीडित महिलेला मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील काही तरुण सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेत तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं.
पीडितेला मदत केल्याच्या रागातनं पीडितेचे नातेवाईक असलेले निवृत्त पीएसआय सखाराम साळुंखे हे पुण्यात आले आणि त्यांनी ओळखीच्या पोलिसांची टीम सोबत आणली. या टीममध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी होते. हे पोलीस कोणतीही पूर्वसूचना न देता ही महिला राहत असलेल्या घरी आले. कोणतेही कारण न देता मोबाईल जप्त करून पासवर्डही बदलल्याचा आरोप आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात येत अर्वाचे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणींनी केलाय. शिवाय रिमांड रूममध्ये ठेवून एपीआय प्रेमा पाटील आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा सुद्धा आरोप या तरुणींनी केलाय.
तरुणींच्या मागणीप्रमाणे पोलिसांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि सुजात आंबेडकर हे सुद्धा रात्रीच कोथरूड पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. जवळपास तीन वाजेपर्यंत हे आंदोलन चालल्यानंतर कोथरूड पोलिसांनी एक खुलासा पत्र दिलं. बघा या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
