खडसेंच्या जावयाची ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली रेव्ह पार्टी; पोलिसांना काय काय सापडलं
हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे.
पुण्यातील खराडी परिसरात एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही पार्टी एका हॉटेलमधील फ्लॅटमध्ये ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेव्ह पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचे सेवन होत असल्याचे आढळून आले. छापेमारीदरम्यान पोलिसांनी गांजा, कोकेनसह इतर अंमली पदार्थ, दारू, हुक्का सेटअप, एक लॅपटॉप, तीन पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे पुण्यातील उच्चभ्रू भागात अशा बेकायदेशीर पार्ट्या होत असल्याच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमधील रूम नंबर 101 आणि 102 प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक करण्यात आले होते. या खोल्यांचे भाडे 2,800 रुपये आणि 10,357 रुपये इतके होते, आणि त्या 25 ते 28 जुलै या कालावधीसाठी राखीव होत्या. या घटनेने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र चर्चांना उधाण आले आहे.
