Raj Thackeray | ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे

| Updated on: Jul 09, 2026 | 1:56 PM

मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विकासकामांवर तसेच पायाभूत सुविधांवर जोरदार टीका केली. मुंबईतील दादर येथील सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रस्ते, कंत्राटदार, पूल आणि सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे म्हणाले की, “कंत्राटदारांना ५६ टक्के द्यावे लागतात, त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात आणि निकृष्ट दर्जाची कामे होतात. अशा परिस्थितीत दर्जेदार विकासकामांची अपेक्षा कशी करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी ब्रिटिशकालीन पायाभूत सुविधांचे उदाहरण देत आजच्या विकासकामांवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (माजी व्हिक्टोरिया टर्मिनस) १८०० च्या दशकात बांधण्यात आले, ते आजही लाखो प्रवाशांचा भार पेलत आहे. तसेच अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग अवघ्या १४ महिन्यांत उभारण्यात आली आणि अनेक दशकांनंतरही भक्कम उभी आहे, असे उदाहरण देत त्यांनी दीर्घकालीन नियोजन आणि दर्जेदार बांधकामांची गरज अधोरेखित केली.

राज ठाकरे यांनी ब्रिटिशांनी उभारलेल्या पुलांचा उल्लेख करत, “ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांची शंभर वर्षांची हमी संपल्याचे पत्र आजही संबंधित देशांना पाठवले जाते. मात्र आपल्या देशात नव्याने बांधलेले रस्ते आणि पूल काही वर्षांतच खराब होतात,” अशी टीका केली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. “वाहतूक मंत्रालयाचे काम सोडून इथेनॉलसारख्या विषयांवर भाष्य केले जाते, तर संबंधित मंत्रालयातील मंत्री त्यावर बोलत नाहीत. देशात नेमकं कोण कोणाचं काम करतंय, हेच समजेनासं झालं आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर विकासकामांचा दर्जा, सार्वजनिक निधीचा वापर आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.

Published on: Jul 09, 2026 1:56 PM
Follow Us