Rupali Patil : मेधा कुलकर्णी किस झाड की पत्ती… शनिवार वाड्यातील दर्ग्यावरून वाद पेटला, रुपाली पाटलांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर शनिवार वाडा येथील दर्ग्याबाबत समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, कारवाई न झाल्यास पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शनिवार वाडा परिसरात कथित नमाज प्रकरणी मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. मेधा कुलकर्णी यांनी दर्ग्याबाबत चुकीची माहिती देऊन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याचे रुपाली पाटील यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, खासदार असूनही आणि प्रोफेसर असूनही मेधा कुलकर्णी यांनी इतिहासाची चुकीची मांडणी केली.
शनिवार वाडा येथील दर्ग्याची नोंद १९३६ पासून असून, १९७० च्या आराखड्यातही तो दिसतो, असे पाटील यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली, पेशव्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते आणि मस्तानीबाई शनिवारवाड्यात नमाज पढत असे, या इतिहासाकडेही त्यांनी लक्ष वेधले. मेधा कुलकर्णी यांनी जाणूनबुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. डीसीपी रावळे यांनी गुन्हा दाखल न केल्यास पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
